सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे जिल्ह्याचे प्रमुख ज्ञानकेंद्र असून, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. शनिवारी (दि.21) रोजी विद्यापीठ परिसरात पीएम उषा योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल या दोन इमारतींचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते.
कुलगुरूंनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, पीएम उषा अंतर्गत मिळणाऱ्या निधीमुळे विद्यापीठात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे कला, ललित कला आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला व कौशल्याधारित शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत असल्याबद्दल कुलगुरूंनी कृतज्ञता व्यक्त केली.