सोलापूर : अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हमी भाव मिळत नसल्याने बाजारपेठेत शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. आधीच उसनवारीने दिवाळी सण साजरा केल्यानंतर आता रब्बीसाठी शासकीय मदत निधी मिळत नसल्याने मिळेल त्या दरानेच सोयाबीन विक्री करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन कमी दरानेच विक्री केली. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरु झालेली नाही. त्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे.
अतिवृष्टीने पिकांत पाणी साचून राहिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. एका बाजूला निसर्गाचा रौद्रावतार, तर दुसन्या बाजुला बाजारपेठेतील मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हमीभावाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाने मात्र अद्याप हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली नाहीत. त्यामुळे सोयाबीन कमी किंमतीत खरेदी करून शेतकयांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
बहुतांश शेतकरी खरीप हंगाम एक आणि रब्बी हंगामात एक असे दोन्ही पिक घेण्यासाठी शेतकरी प्राधान्याने खरिपात सोयाबीन पेरणी करतात. सप्टेंबर अखेरपर्यंत सोयाबीनची काढणी झाल्यानंतर ज्वारी, करडई, सुर्यफुल, हरभरा, गहू अशी रब्बी हंगामात दुसरी पिके घेतात. परंतू यंदा दिवाळी संपली तरी पाऊस थांबण्याचा नावच घेईना, त्यामुळे रब्बी पेरणीचा नैसर्गिक आणि आर्थिक दोन्ही संकट उभे राहिले आहेत.
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता सुरुवातीला पीक चांगले होते. परंतु, काढणीच्या वेळी अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपले, शेतामध्ये पाणी साचले आणि सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झाले. सततच्या पावसाने सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली असून त्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.