Varsha Somnath Patne file photo
सोलापूर

South Solapur politics: दक्षिण सोलापूरच्या राजकारणात खळबळ; उपसभापतींच्या जात प्रमाणपत्राबाबत समितीचा निर्णय

दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

South Solapur politics

कासेगाव: दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याचे नमूद करत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित प्रमाणपत्र जप्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.

होटगी स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुळे यांनी या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर समितीने प्रकरणाची सुनावणी घेत विविध कागदपत्रे, शासकीय अभिलेख तसेच उपलब्ध नोंदींची छाननी केली. समितीसमोर उपलब्ध माहितीनुसार, निवडणूक अर्जासोबत वर्षा शिवाजी कोनाळे (मूळ रा. फणेपूर, ता. उमरगा) यांनी राज्याच्या ओबीसी यादीतील अनुक्रमांक १९० वरील वाणी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणात समितीने दोन वेळा सुनावणी निश्चित केली होती. मात्र दोन्ही वेळा संबंधितांकडून उपस्थिती राहिली नसल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते.

तपास प्रक्रियेदरम्यान प्रमाणपत्रावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयीन शिक्का तसेच अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली. यासंदर्भात संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झाले नसल्याचे लेखी कळविल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बारकोड तपासणीत संबंधित माहिती उपलब्ध होत नसल्याची बाबही निदर्शनास आल्याचे समजते. या सर्व बाबींच्या आधारे समितीने संबंधित प्रमाणपत्राबाबत निर्णय दिल्याचे सांगितले जात असून, पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे, बोरामणी पंचायत समिती गणातून झालेल्या निवडणुकीत वर्षा पटणे यांनी २,१४३ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना ६,३०७ तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना ४,१६४ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT