दक्षिण सोलापूर : शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे खरड छाटणीनंतर उगवलेली सर्व द्राक्ष बागेचे नवीन फुटवे तुटल्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे द्राक्ष वेलीचे पाने आणि नव्याने फुटलेले शेंडे तुटून गेले आहेत. आगामी काळात द्राक्ष उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादन घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यामध्ये द्राक्षांचा हंगाम संपल्यानंतर द्राक्षांची खरड छाटणी करण्यात आली होती. या खरड छाटणीनंतर द्राक्षांच्या वेलीला नवीन फुटवे फुटले होते. हे फुटवे म्हणजेच आगामी वर्षातील उत्पन्नाचे स्त्रोत आहे. मात्र ज्या नवीन फुटव्यांना द्राक्षचे घड लागणार होते, त्याचे शेंडे आणि पाने गारपिटीमुळे पूर्ण झडून गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेंडे खुडलेल्या आणि पाने झडलेल्या वेलीला द्राक्ष घड लागण्याची शक्यता कमी होते आणि लागल्यास त्या कमकुवत राहतील आणि त्याचा द्राक्ष उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असून, द्राक्ष उत्पादन घटणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
कुंभारी, वडगाव, दर्गनहळ्ळी, होटगी, होटगी स्टेशन, यत्नाळ या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, द्राक्षबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमधून होत आहे.