भंडारकवठे : दक्षिण सोलापूर पंचायत समितीत कृषी अधिकाऱ्यांच्या एकूण चार जागा असून यापैकी तीन जागा रिक्त आहेत. यामुळे या विभागाच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत. येथील पंचायत समितीतील एकाच अधिकाऱ्यावर तालुक्यातील कृषी विभागाचे कामकाज सुरू आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे कृषी अधिकारी असणे आवश्यक आहे. पण, एकाच अधिकार्यावर सध्या कामकाज सुरू असल्याने कृषी विभागाच सध्या कमकुवत बनला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण ८३ महसुली गावांची संख्या आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजना गाव पातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडे पुरेसे अधिकारी व कर्मचारी असणे आवश्यक आहे. ते असतील तरच कृषी विभागाच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणे शक्य होते.
शेतकऱ्यांसाठी किमान डझनभर योजना राबवल्या जातात. या सर्व योजना त्यांच्या बांधावर पोहोचवण्यात सध्या अडचणी येत आहेत. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या येथे पुरेशी नाहीत. वास्तविक पाहता या तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांची चार पदे आहेत. कार्यरत अधिकाऱ्याला कार्यालयीन कामकाज सांभाळून विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला भेटी द्याव्या लागतात. पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने राज्य व केंद्राच्या कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येतात. पर्यायाने या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. यात अनेक योजना ह्या वैयक्तिक लाभाच्या देखील आहेत.
या पंचायत समितीत रिक्त असलेल्या तीनही कृषी अधिकारी पदावर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. ते झाल्याशिवाय शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचविता येणार नाहीत.अन्यथा या योजना कागदावरच राहतील.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील कृषी अधिकार्यांच्या रिक्त पदावर तीन नवीन अधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र व राज्य सरकारच्या कृषि विषयक योजनापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची काळजी घेतली जाईल.- रामप्पा चिवडशेट्टी, सभापती कषी व पशुसंवर्धन समिती जि. प.