मंगळवेढा : घरगुती कारणाचा राग मनात धरून मुलाने वडिलांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील डोणज येथे घडली; मात्र या प्रकरणात मुलाने वडिलांचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव केला; मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास लावत मुलास ताब्यात घेतले.
या प्रकरणातील सविस्तर हकीकत अशी की, महादेव कुसाप्पा पुजारी (वय 70) हे जमिनीची वाटणी करू देत नाहीत, जनावरे शेतातील पिकात गेल्याच्या कारणाने भांडण करतात, घरात पुरेशी पाणी भरू देत नाहीत या कारणांचा राग मुलगा काशिनाथ महादेव पुजारी (वय 40) याच्या मनात होता. वेळा अमावशा निमित्ताने शेतात पूजा करून जात असताना सायंकाळी पाच ते रात्री साडेसातच्या दरम्यान गावातील अशोक मलगोंडे यांच्या पडीक शेत जमिनीजवळ दबा धरून बसलेल्या मुलाने मागून डोक्यात दगड घातला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, आजोबा घरी परत का आले नाही, असा इतर नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळले. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात आपल्या वडीलाचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी वन्य विभागाला घटनास्थळी पाचारण केले. मात्र पोलिसांनी मृतदेहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यावेळेला वेगळा संशय जाणवला. व शेजारच्या काही अंतरावरील दगड उपसल्याचे लक्षात आले.
खुनाचा संशय वाटल्याने तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत मुलाची कसून तपास केला असता त्याने घरगुती कारण सांगत वडिलांचा खून केल्याची कबूल दिले व त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. शनिवारी मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.