सोलापूर : सोलापूरची रंगभूमी प्रगल्भ आहे. सोलापूरच्या नाट्यभूमीने अनेक दिग्गज कलाकार राज्याला दिले आहेत. जब्बार पटेल, फैयाज, अतुल कुलकर्णी, किशोर महाबोले, अमीर तळवळकर, अक्षय कोठारी, भाग्यश्री लिमये या नाट्यकलावंतांचा समावेश आहे. हे कलाकार विविध नाटक, चित्रपट, तसेच हिंदी मराठी सिरीयलमध्ये काम करत सोलापूरचे नाव देशभरात गाजवत आहेत. जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमिवर सोलापूरच्या या सुपूत्रांना मानाचा मुजरा.
जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी 27 मार्चला साजरा केला जातो. नाट्यकलेचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित व्हावे. रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक, नाटककार आणि प्रेक्षकांना एकत्र येत थिएटरच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक संवाद साधला जावा, यासाठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजप्रबोधन आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच हा दिवस जागतिक रंगभूमी प्रेमींना एकत्र आणणारा महत्त्वाचा दिवस मानला जातो.
नाट्य परिषदेच्या माध्यमातून सोलापुरात दोनवेळा नाट्य परिषदेचे आयोजन केले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नाट्य परिषद नेहमी अग्रेसर राहिली आहे. सोलापूरचे अनेक कलाकार चित्रपट, मालिकांमध्ये सोलापूरचे नाव गाजवत आहेत.- दादा साळुंखे,अध्यक्ष, नाट्य परिषद उपनगरीय शाखा
लेखक आणि कलावंतांना एकत्रित करून काही नाटकांची निर्मिती केली. त्या नाटकांना अनेक राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली. त्या नाटकांचे राज्यात व इतर राज्यातही प्रयोग होऊ लागले. हौशी प्रयोग करता करता सोलापुरात प्रायोगीक, व्यावसायिक नाटके मागवण्याचा व्यवसाय सुरू केला. कलावंतांची ओळख झाली. हा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. रसिकवर्ग तयार करण्याचा प्रयत्न केला.- गुरू वठारे, सदस्य, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई