सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी भाजपचे सदस्य आपल्या नेत्यांकडे लॉबिंग करत असून अर्थ व बांधकाम, आरोग्य व शिक्षण आणि समाजकल्याण समितीचे सदस्य होण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य धडपड करत असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सूचनेने प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी बुधवार, दि. 15 एप्रिलला दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा होणार असल्याची नोटीस सदस्यांना बजावली. त्यानंतर महत्त्वाच्या विषय समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावे, यासाठी सदस्यांकडून धडपड सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व विषय समित्यावरील जागांच्या निवडणुकीबाबतची नामनिर्देशनपत्रे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सभेच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. नियमाप्रमाणे सभा सुरू होताच महाराष्ट्र जिल्हा परिषद (समित्यांच्या निवडणुका) नियम 1967 मधील प्रमाणे निवडणुकीचे कामकाज पार पाडून समितीवर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.-स्मिता पाटील, डेप्युटी सीईओ, प्रशासन विभाग, जि.प. सोलापूर