सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील 16 गावात कल्टर प्रकल्प होणार आहे. त्या प्रकल्पात आजूबाजूच्या गावातील मैलागाळ उपसा करून सोनखत तयार केले जाणार आहे. ते सोनखत नाममात्र दरात शेतकर्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामपंचायतींचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात एक हजार 124 ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतीमधील एक लाख 13 हजार 349 सेफ्टी टँकमधून मैलागाळ उपसा करून 16 कल्टर प्रकल्पामध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून सोनखत तयार करण्यात येणार असून, ते खत शेतकर्यांना विक्री केले जाणार आहे. जिल्ह्यात एक लाखांपेक्षा जास्त कुटुंब शौचालयांचे बांधकाम करतेळी दोन सेफ्टी टँक बांधले आहेत. त्यामुळे त्या सेफ्टी टँकमधून मैलागाळ उपसा करणे आवश्यक आहे.
मात्र, या गाळ उपसा करून रस्ते, ओढा, नाल्यात टाकाला जातो. त्यामुळे रोगराई पसरत असते. त्याला प्रतिबंध व्हावे, यासाठी आता जिल्ह्यातील सोळा ठिकाणी कल्टर सेफ्टी प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे.
येथे होणार प्रकल्प
अक्कलकोट येथील जेऊर, बार्शी येथील मालेगाव, माढा तालुक्यातील मोडलिंब, कुर्डू, माळशिरस येथील यशवंतनगर, मांडवे, मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजीनगर, मोहोळ येथील वडवळ, पंढरपूर तालुक्यातील भोसे, वाखरी, सांगोला येथील नाझरे, महूद, उत्तर सोलापूर येथील बीबी दारफळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, मंद्रूप येथे सोनखत तयार करण्यासाठी कल्टर प्रकल्प होणार आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार
जिल्ह्यातील 16 गावात कल्टर प्रकल्प होणार आहे. त्या प्रकल्पामध्ये सोनखत तयार करून विक्री केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढणार आहे. त्यामुळे कल्टर प्रकल्प आपल्या ग्रामपंचायतींना मिळावे, यासाठी विविध सरपंच प्रयत्न करत आहेत. मात्र, स्वच्छता विभागाकडून पात्र असणार्या ग्रामपंचायतींना कल्टर प्रकल्पास अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 16 गावांत कल्टर प्रकल्प होणार आहे. त्यासाठी तांत्रिक मान्यता प्रस्तावित असून, लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायत आणि शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.-अमोल जाधव, डेप्युटी सीईओ, स्वच्छता विभाग, जि.प. सोलापूर