Solapur ZP Pudhari
सोलापूर

Solapur ZP: झेडपी, पंचायत समितीला 29 कोटींचा निधी

पालकमंत्र्यांनी शब्द पाळला; केंद्रीय वित्त आयोगाकडून आणला निधी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्रीय वित्त आयोगाकडून सोलापूर जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांसाठी मिळून 29 कोटी 22 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 14 कोटी 61 लाख जिल्हा परिषदेला तर 14 कोटी 61 लाख रुपयांचा निधी पंचायत समित्यांना मिळणार आहे.

पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीआधी झेडपी सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर त्यांनी 29 कोटी 22 लाखांचा निधी आणून दिलेला शब्द पाळला आहे.

जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आणल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त निधी मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्याला यश आले असून, केंद्रीय वित्त आयोगाने जिल्हा परिषदेसाठी 14 कोटी 61 आणि पंचायत समित्यांसाठी 14 कोटी 61 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून पाणी पुरवठा, स्वच्छता विषयक कामे, गाव अंतर्गत गटारी, रस्ते, शाळा, अंगणवाडी कामे, आरोग्य केंद्राची दुरुस्ती, स्मशानभूमी, जोडरस्ते, पथदिवे आदी विकास कामे होणार आहेत.

तालुकानिहाय निधी

अक्कलकोट - एक कोटी 29 लाख, बार्शी - एक कोटी 23 लाख, करमाळा - एक कोटी 25 लाख, माळशिरस - एक कोटी 93 लाख, मोहोळ - एक कोटी 22 लाख, मंगळवेढा - एक कोटी 83 लाख, उत्तर सोलापूर - 65 लाख 96 हजार, पंढरपूर - एक कोटी 67 लाख, सांगोला - एक कोटी 47 लाख, दक्षिण सोलापूर - एक कोटी 34 लाख असे एकूण 14 कोटी 61 लाख रुपयांचा निधी पंचायत समित्यांना देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT