Solapur ZP Election Pudhari
सोलापूर

Solapur ZP Election Result: मिनी मंत्रालयावर भाजप की आघाडी

पंचायत समित्या, जिल्हा परिषद निवडणुकीची आज मतमोजणी; मोठी उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि 136 गणांसाठी सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार असून, मिनी मंत्रालयावर भाजप की राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांची आघाडी सत्तेत येणार, याबाबतचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. यंदा जिल्हा परिषदेसाठी चुरशीने मतदान झाल्याचे पाहायला मिळाले असले, तरी मतदानाचा टक्का घटला आहे. या घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार, यावरून सत्तेचे गणित ठरणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी 271, तर पंचायत समित्यांसाठी 485 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 24 लाख 59 हजार 22 मतदारांपैकी 16 लाख 20 हजार 577 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यात 65.90 टक्के इतके मतदान झाले आहे. मतमोजणी त्या त्या तालुकास्तरावर होणार असून, त्यासाठी प्रशासनाने 15 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मतमोजणीदरम्यान आणि मतमोजणीनंतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागील आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून निवडणुकीत भाजपची यंत्रणा कामाला लावली होती. माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ, करमाळा, सांगोला या तालुक्यात पालकमंत्री गोरे यांनी विजयासाठी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील, आ. अभिजित पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते.

भाजपाविरोधी सर्व पक्ष एकत्रित

यंदा भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेच्या 68 गटासाठी 59 गटावर उमेदवार कमळ चिन्हावर उभे केले आहेत. बहुमताचा 35 आकडा गाठण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. तर शिंदेसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस यांनी भाजपासमोर आव्हान उभे केले आहेत. त्याचा निकाल आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

यांच्या निकालाकडे लक्ष

माजी आ. रविकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाऊ सागर कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे, मुलगी शीतल म्हेत्रे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सून वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांचे चिरंजीव, माजी आ. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, माजी आ. दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने, माजी मंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल हे दिग्गज यंदाच्या निवडणुकीत रिंगणात असल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.

येथे होणार मतमोजणी

करमाळा : शासकीय धान्य गोदाम, करमाळा, माढा : वखार महामंडळ गोदाम, अकुलगाव, ता. माढा, बार्शी : शासकीय धान्य गोदाम, उपळाई रोड, बार्शी, उत्तर सोलापूर : नूतन मराठी विद्यालय, डफरीन चौक, सोलापूर, मोहोळ : शासकीय धान्य गोदाम, मोहोळ, पंढरपूर : शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर, माळशिरस : शासकीय धान्य गोदाम, म्हसवड रोड, माळशिरस, सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, सांगोला, मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर : शहीद राहुल शिंदे सभागृह एसआरपी कॅम्प क्र. 10, सोरेगाव, अक्कलकोट : तहसील कार्यालय, अक्कलकोट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT