सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा ओबीसी खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. जिल्ह्यातील 17 गट हे ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्या राखीव गटातून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी राजकीय गॉडफादरकडे मोठी फिल्डींग लावली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 21 जानेवारी म्हणजे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवार नेत्यांकडे तळ ठोकून आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत 68 गट असून, यात 17 गट हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत. यात आठ महिलांसाठी तर 9 ओबीसीतील खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. सन 2017 मध्ये 68 जिल्हा परिषद गट होते. अकलूज, अनगर हे जिल्हा परिषद गट नगरपरिषद आणि नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने दोन गट कमी झाल्या आहेत. परंतू नव्याने गट रचनेत 68 गट संख्या जैसे थे राहिल्या आहेत. यंदा भाजपाने समविचारी नेत्यांनाही कमळ चिन्हावरच लढविण्यासाठी आग्रही आहे. सोलापूर मनपानिवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर भाजपाने आता जिल्हा परिषदेतही शत प्रतिशतचा नारा देत 68 पैकी 35 हा बहुमताचा मॅजिक फिगर गाठण्याचा उद्दीष्ट ठेवले आहे. 2017 मध्ये भाजपाच्या चिन्हावर 14 नगरसेवक निवडून आले होते. यंदा ती संख्या दुप्पटीवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यंदा भाजपाच्या बाजूने माजी आ. राजन पाटील, माजी जि. प. सदस्य रणजितसंह शिंदे, माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी आ. दिलीप माने यांचा भाजपात प्रवेश झाल्याने बळ वाढले आहे.
अध्यक्षपदासाठी अक्कलकोट, द. सोलापूरचा राहणार दावा
जिल्हा परिषद स्थापनेपासून आतापर्यंत अक्कलकोट, दक्षिण सोलापूरला अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात अक्कलकोट हे केंद्रस्थानी राहिले आहे. त्यामुळे सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही सत्तेवर आले आणि या दोन्ही तालुक्यातून ओबीसी प्रवर्गातून उमेदवार निवडून आल्यास अध्यक्षपदासाठी राजकीय वजन वापरण्याची शक्यता आहे.
ओबीसीतून यांना मिळाली संधी, कंसात कार्यकाल
बाबुराव जाधव (21 मार्च 1997 ते 20 मार्च 1998), नारायण खंडागळे (21 मार्च 2002 ते 17 फेबु्रवारी 2005), वैशाली सातपुते (18 फेबु्रवारी 2005 ते 20 मार्च 2007), डॉ. निशिगंधा माळी - कोल्हे (21 मार्च 2012 ते 20 सप्टेंबर 2014) यांना ओबीसी आरक्षणातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली होती.