मंगळवेढा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी मंगळवेढा स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे.सर्व मतदान पथके आज दि. 6 रोजी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. मंगळवेढा तालुक्यात एकूण 4 जिल्हा परिषद गट असून 8 पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात एकूण 189 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत. मतदान घेण्यासाठी सर्व केंद्र मिळून एकूण 1264 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण 217 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये केंद्राध्यक्ष 217, मतदान अधिकारी क्रमांक 217, मतदान अधिकारी क्रमांक 217, मतदान अधिकारी क्रमांक 217, केंद्रावरील पोलीस कर्मचारी 189, शिपाई 207 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व मतदान पथकांना शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 8 वा. शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा येथे राहण्यास कळवले आहे. जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा येथून सर्व कर्मचाऱ्यांना मशीन व साहित्य वितरण केले जाणार आहे. त्यासाठी एकूण 16 टेबल वरून 135 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साहित्य वितरण केले जाणार आहे.
मतदानासाठी केंद्रावरील एकूण 189 कंट्रोल युनिट व 189 बॅलेट युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त 25 कंट्रोल युनिट राखीव व 25 बॅलेट युनिट राखीव तयार करण्यात आले आहेत. नागणेवाडी येथील नानासाहेब प्रशाला येथील मतदान केंद्र क्रमांक 105/16 या ठिकाणी सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्राचा संपूर्ण कारभार महिला कर्मचारी सांभाळणार आहेत. त्याचबरोबर मरवडे येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे मतदान केंद्र क्रमांक 108/16 याठिकाणी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. मतदान दिवशी मतदारांना केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तालुक्यातील संवेदनशील केंद्राची नोंद नसून कोणत्याही केंद्रावर कायदा सुव्यवस्था स्थिती अबाधित रहावी. यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवेढा तालुक्यासाठी अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. मतदान दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने निष्पक्ष व निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी केले.