सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गट, गणातील सर्वच पक्षांतील उमेदवारांकडून गतीने प्रचार सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते यांची धांदल सुरू आहे. उघड प्रचार थांबल्यानंतर छुप्या घडामोडींना वेग येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शनिवारी (दि.7) मतदान होणार असून, सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रचार थांबणार असल्यामुळे प्रचारासाठी आजचा गुरुवार (दि. 5) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रचारात गती आली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गावोगावी सभा, रॅली, पदयात्रा, घराघरांत भेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रचारासाठी आमदार, माजी आमदार, नेत्यांसह इतर कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरल्याने प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे.
दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या तासांत मतदारांचा कल आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांकडून वैयक्तिक संपर्कावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच मोठ्या गावातील मोठा नेता आपल्या बाजूला वळून मताधिक्य वळविण्यासाठी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांकडून प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय जाणकरांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात 3 दिवस ‘ड्राय डे’
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने 6 फेब्रुवारी (मतदानाच्या आदला दिवस), 7 फेब्रुवारी (मतदानाचा दिवस) आणि 9 फेब्रुवारी रोजी (मतमोजणीचा दिवस) असे तीन दिन दिवस जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित जि.प.व त्या अंतर्गत पं. स. निर्वाचन क्षेत्रातील तसेच ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या कार्यक्षेत्रातील दुकानांतील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित परवानाधाकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.