सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विविध आघाडींमध्ये आता निवडणूक चिन्हे मिळविण्यात चुरस दिसून येत आहे. यात पंढरपूर-मंगळवेढा स्थानिक विकास आघाडीला जिल्हा प्रशासनाने कपबशी हे चिन्ह दिले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी हे चिन्ह आरक्षित झाले आहे. उर्वरित सोलापूर जिल्ह्यातील पाच विकास आघाड्यांना चिन्ह मिळविण्यात अपयश आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्यासाठी चिन्ह आरक्षित करण्यात यावे, यासाठी पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीने 14 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. तसेच, सांगोला तालुका स्थानिक विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र राज्य, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर, करमाळा तालुका विकास आघाडी, शेतकरी आघाडी, सांगोला यांचेही अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर होते.परंतु मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण सदस्यांपैकी म्हणजे 68 पैकी 3.4 टक्के म्हणजे 3 सदस्य निवडून येणे आवश्यक असते. यातील पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये एकूण 3 सदस्य निवडून आलेले होते. त्यामुळे त्यांना यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी यांनी मागणी केल्याप्रमाणे कपबशी हे चिन्ह आरक्षित केले गेले. उमेश परिचारक हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. माजी आ. प्रशांत परिचारक यांचे बंधू आहेत.
परंतु सांगोला तालुका स्थानिक विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र राज्य, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर, करमाळा तालुका विकास आघाडी, शेतकरी आघाडी, सांगोला यांचे मागील निवडणुकीत 3 सदस्य निवडून न आल्याने त्यांच्या मागणीनूसार चिन्ह आरक्षिततेची मागणी अपात्र ठरली. सन 2017 मध्ये या आघाड्यांचा 68 पैकी 3 सदस्य निवडून न आलेल्या नियमांची पूर्तता होत नसल्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुक्तचिन्ह एक चिन्ह आरक्षित करण्याचा अर्ज नामंजूर केला आहे.
मुक्त चिन्ह आरक्षितसाठी असा आहे नियम
मागील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान 5 टक्के जागा जिंकल्या असतील किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण जागांच्या 5 टक्के जागा या एका जागेपेक्षा कमी येत असतील, तर किमान एका जागेवर त्या पक्षाचा उमेदवार विजयी झालेला असल्यास, त्या पक्षासाठी त्यांच्या विनंतीवरून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात आरक्षित असल्याचे घोषित केले जाते.