सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता शुक्रवारी (दि. 27) चार विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवड होणार आहे. ही पदे कोणकोणत्या तालुक्यांना मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष म्हणून दीपक वैद्य, उपाध्यक्ष म्हणून इंद्रजित पवार यांची निवड केली आहे. त्यानंतर आता सभापतिपदांची नावे पालकमंत्री जाहीर करणार आहेत. त्यामध्ये कोण कोणत्या तालुक्यांना सभापतिपदांची लॉटरी लागणार हे शुक्रवारी जाहीर होणार आहे.
अक्कलकोट, माळशिरस, माढा आणि मंगळवेढा तालुक्यांतील नेत्यांनी ही पदे आपल्या तालुक्यातील सदस्यांना मिळावीत, यासाठी पालकमंत्री गोरे यांच्याकडे लॉबिंग लावले आहे. त्यामुळे या तालुक्यातील सदस्यांना सभापतिपदांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभापतिपद कोणत्या तालुक्यांना द्यायचे आहे हे निश्चित झाले असून, फक्त नावांची घोषणा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
सभापतिपदासाठी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ असेल.- गणेश निऱ्हाळी, अपर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी