Solapur ZP Pudhari
सोलापूर

Solapur ZP: झेडपी कृषी विभाग होणार खिळखिळा

राज्यातील 1,056 पदे कमी होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा
अमोल साळुंके

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधांनुसार एक हजार 56 जागा कमी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कृषी विभाग खिळखिळा होण्याची शक्यता आहे.

नव्या आकृतिबंधाचा राज्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मोठा फटका बसणार असून, कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांची तब्बल एक हजार 56 पेक्षा जास्त पदे कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य कपातीमुळे ग्रामीण भागातील कृषी सेवा, मार्गदर्शन यंत्रणा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासन स्तरावर प्रशासकीय पुनर्रचनेचा भाग म्हणून नव्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. या बदलानुसार अनेक पदांचे पुनर्विन्यास व कपात प्रस्तावित असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः कृषी विभागातील अधिकारी व विस्तार यंत्रणेतील कपात ही चिंतेचा विषय ठरणार आहे. कृषी विभागातील कामांचा शेतकऱ्यांचा थेट संबंध येत असतो. या पार्श्वभूमीवर पदे कमी करणे विभागाला खिळखिळा करण्यासारखे आहे.

कृषी विस्तार अधिकारी हे थेट शेतकऱ्यांशी संपर्कात राहून विविध योजनांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन आणि अंमलबजावणीस मदत करतात. त्यांच्या संख्येत घट झाल्यास योजनांचा लाभ वेळेवर पोहोचणे, पीक सल्ला देणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या बाबींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नव्या आकृतिबंधानुसार ही पदे वाढविण्याची गरज आहे. मात्र, शासनाकडून ती पदे कपात करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT