Solapur ZP: शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी दिग्गजांचे अर्ज  Pudhari Photo
सोलापूर

Solapur ZP Elections: शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी दिग्गजांचे अर्ज

अर्जांची आज छाननी : सर्वच पक्षातील उमेदवारांची दिवसभर धावपळ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.21) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मोठ्या संख््येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी सदस्य उमेश पाटील, रश्मी बागल, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाऊ सागर कल्याणशेट्टी, माजी आ. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, रामप्पा चिवडशेट्टी, सोनाली कडते यांचा समावेश आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांची धावपळ उडाली. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्यासंदर्भातील काम प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात रात्री उशीरापर्यत सुरू होते. यातील सात तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या गटासाठी अंदाजे 490 तर पंचायत समितीच्या गणासाठी 794 अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती डोंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केला. कुरुल जि.प. गटातून उमेश पाटील, चपळगाव गटातून शांभवी कल्याणशेट्टी, वागदरी गटातून आनंद तानवडे, सागर कल्याणशेट्टी, करमाळा तालुक्यातील पांडे गटातून रेश्मी बागल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गटातून रामप्पा चिवडशेट्टी, मंद्रूप गटातून सोनाली कडते, माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटातून संस्कृत सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.16) जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याकडे पाठ फिरवली होती. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच गट, गणातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांची धावपळ उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसले.

27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार

निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. आज, गुरुवारी (दि.22) प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर 27 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT