सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांचे गुरुवारी (दि.16) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेतील कामकाज, कामे कशी करून घ्यावीत यासह विविध विषयांवर धडे देणार आहेत. त्यामुळे सदस्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह नवनियुक्त सदस्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सदस्यांना मान्यवर तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सखोल चर्चा करण्यात येईल. कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, उपसंचालक आनंद पुसावळे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बुट्टे-पाटील, राज्य प्रकल्प व्यवस्थापक बाळासाहेब जगताप हे मार्गदर्शन करणार आहेत.