Solapur Zilla Parishad election
बार्शी : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना (ठाकरे आणि शिंदे गट) आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांनी मिळून एक 'महाआघाडी' स्थापन केली आहे.
बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ६ जागा आणि पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागा जिंकण्यासाठी ही महाआघाडी एकत्र लढणार आहे. ही महाआघाडी भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील गटाविरोधात लढणार आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत या महाआघाडीची माहिती दिली असून कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे.
संजय राऊत यांनी "शिंदे गटासोबत कधीही जाणार नाही" अशी भूमिका घेतलेली असतानाही, बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्हा याला अपवाद ठरताना दिसत आहे. बार्शीमध्ये भाजपला रोखण्यासाठी पारंपारिक विरोधक असलेल्या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटांनी स्थानिक पातळीवर हातमिळवणी केली आहे.