सोलापूर जिल्‍हा परिषद 
सोलापूर

Solapur News : जिल्‍हा परिषदेच्‍या १,१६९ वर्गखोल्या धोकादायक

१,४२१ खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण : ८७७ खोल्या पाडल्‍या

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषदेच्‍या अकरा हजार ६०५ वर्गखोल्‍या आहेत. त्‍यातील १,४२१ खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले. त्‍यातील १,१६९ वर्गखोल्‍या धोकादायक आहेत. तर यातील ८७७ वर्गखोल्‍या पाडण्यात आल्‍या आहेत. तर २९२ धोकादायक वर्गखोल्यांचे पाडकाम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींच्या सावलीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत २,७७२ शाळा असून, या शाळांमध्ये एकूण ११ हजार ६०५ वर्गखोल्या आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेल्या शाळा इमारतींची सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया हाती घेण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ १,४२१ वर्गखोल्यांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण वर्गखोल्यांच्या तुलनेत अत्यल्प वर्गखोल्यांचीच संरचनात्मक तपासणी झाली आहे.

ऑडिट पूर्ण झालेल्या वर्गखोल्यांपैकी १,३४६ वर्गखोल्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी शिक्षण समितीने १,२४८ वर्गखोल्यांना मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १,२४३ वर्गखोल्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यातील १,२४२ प्रस्ताव बांधकाम विभाग एक व दोनकडे पाठविण्यात आले. पुढे १,२२१ वर्गखोल्यांचे प्रस्ताव अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेनंतर १,१६९ वर्गखोल्या अधिकृतपणे धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.

माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक धोकादायक वर्गखोल्‍या

माळशिरस तालुक्यात सर्वाधिक २७५ वर्गखोल्या धोकादायक घोषित केल्या आहेत. त्यापाठोपाठ मोहोळमध्ये १२२, तर उत्तर सोलापूरमध्ये १०८ वर्गखोल्या धोकादायक आहेत. अक्कलकोट तालुक्यात २५४ शाळांमध्ये १,१९६ वर्गखोल्या असून त्यापैकी १३८ वर्गखोल्यांचे ऑडिट झाले आहे. बार्शी तालुक्यात १७५ शाळांमधील ८२४ वर्गखोल्यांपैकी ९५ वर्गखोल्यांचे ऑडिट पूर्ण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT