सोलापूर : सोलापूर शहरातील गजबजलेल्या सत्तर फूट रोड परिसरात माधव नगर येथे रविवारी (दि. 3) सकाळी साडेदहाच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने भर रस्त्यात दुचाकी अडवून एका तरुणाची कोयत्याने आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. सुरेश कृष्णा श्रीराम (वय 35, रा. नीलमनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाच्या दराऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याप्रकरणी जेल रोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजय श्रीराम, रोहित अन्नारेड्डी, राहुल अन्नारेड्डी, सुभाष सगडा, सुमित श्रीराम (रा. कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक) यांना ताब्यात घेतले आहे. एकजण फरार आहे. सुरेश श्रीराम हे सकाळी व्यायामासाठी जीमला जात असताना हा जीवघेणा हल्ला झाला. वराह पालनावरून संशयित आरोपी आणि मयतामध्ये पाच वर्षांपूर्वी वाद झाला होता. सुरेश यांनी 2020 मध्ये संशयित आरोपींविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा खटला सध्या न्यायालयात अंतिम टप्प्यात आला होता.
ही केस मागे घेण्यासाठी संशयित आरोपी सुरेशवर वारंवार दबाव टाकत होते. यामुळे आपल्याला शिक्षा होईल, या भीतीपोटी संशयितांनी हे कृत्य केल्याचे कुटुंबाने सांगितले. या प्रकरणी मयताची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राऊत करत आहेत.
आठ मुले उघड्यावर
सुरेश श्रीराम यांच्या खुनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात तीन पत्नी आणि आठ मुले (सहा मुले, दोन मुली) असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मोठ्या मुलाने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असतानाच वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
एका मिनिटात संपवला खेळ
सत्तर फूट रोडवरील ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुरेश जिमला जात असताना संशयित दबा धरून बसले होते. त्यांनी भररस्त्यात त्यांना गाठून कोयते, हॉकी स्टिक आणि दगडांनी केवळ एका मिनिटात हल्ला केला आणि पसार झाले.