टेंभुर्णी : - मौजे भिमानगर येथील कॅनॉलमध्ये मिळून आलेल्या अनोळखी बेवारस तरुणांच्या खुनाचा २४ तासात छडा लावण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले असून खुनातील सख्या भावासह तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.तो दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
तिन्ही अटक आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आश्रम विठ्ठल करंडे (वय-३१) रा.फपाळवाडी ता.बार्शी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर रणजित उर्फ सौरभ करंडे (वय-२६),सचिन धर्मा चौधरी (वय-३२) व सोमनाथ उर्फ शाम मोहन तांबे (वय-३२) तिघे रा.फपाळवाडी,ता बार्शी असे पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
मौजे रांझणी-भिमानगर येथे उजनी धरणाच्या मुख्य कॅनॉलमध्ये ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. अनोळखी पुरुषाचा हातपाय दोरीने बांधून त्याच दोरीला मोठा दगड बांधुन खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याची बॉडी उजनी कॅनॉलमध्ये फेकून दिलेली पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र पथक नेऊन तपास सुरू केला.त्याच्या छातीवर व हातावर येडेश्वरी व साईराम असे गोंदलेले होते. टेंभुर्णी पोलिसांनी तपासाची योग्य दिशा ठरवून तपास सुरू केला असता मयत व्यक्ती फपाळवाडी ता.बार्शी येथील आश्रम विठ्ठल करंडे (वय-३१) रा. फपाळवाडी ता.बार्शी हा असल्याचे समजले.विठ्ठल नवनाथ करंडे व त्याचे इतर नातेवाईक यांच्याशी संपर्क करून त्यांना मयत व्यक्तीचे वर्णन सांगितले त्यावरून त्यांनी देखील आश्रम करंडे असल्याचे सांगितले.
यातील मयत आश्रम करंडे यांच्या विषयी त्याचे गावात व परीसरात माहीती घेतली असता त्यास दारू पिण्याचे व्यसन असुन तो नेहमी भांडणे करीत असे.त्याच्यावर पेालीस ठाण्यास गुन्हे दाखल असल्याचे व त्याने वडीलांना देखील दारू पिण्यासाठी पैशाचे कारणावरून शिवीगाळ केल्याची माहीती मिळाली. तो बाहेरचे लोकांना दारू पिऊन त्रास देत असे समजले.
मयताचा भाऊ रणजित याच्याकडे चौकशी केली असता त्यांने मयत हा दारू पिवुन घरात तसेच बाहेरचे लोकांना देखील नेहमी त्रास देत असल्याचे सांगितले.त्याच्या कडे तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता त्यांने व त्याचे नातेवाईक सचिन चेोधरी व श्याम तांबे यांनी गुन्हाची कबुली दिली.तो दारू पिऊन सर्वांना भयंकर त्रास देत असे. हा त्रास असह्य झाल्याने यातील आरोपीनी बार्शी जवळील कदमवस्ती येथे लोखंडी दाताळाने त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. जखमी अवस्थेत कारमध्ये घालुन चालु गाडी मध्येच त्याचा दोरीने गळा दाबुन त्यास ठार मारले व कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अतुल कुलकर्णी,अप्पर पेालीस अधिक्षक प्रीतम यावलकर,सहा.पोलीस अधिक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पेालीस निरीक्षक संजय जगताप व टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व सपेानि विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के,पीएसआय अजित मोरे, यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली आहे.