करमाळा : करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे उजनी जलाशयाच्या काठी अंदाजे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणीच्या गळ्याभोवती ओढणी आवळलेली दिसून येत असल्याने तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. करमाळा पोलिसांसमोर मृत तरुणीची ओळख पटविण्याचे आव्हान आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. तिच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि लाल रंगाचा टॉप असल्याची माहिती समोर आली आहे.
तरुणीचा मृतदेह उजनी जलाशयाच्या काठी आढळल्याने तो पाण्यातून वाहत आल्याची शक्यता परिसरात व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिचा खून झाला आहे का आणि हा प्रकार कुठे घडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, मृतदेहाच्या गळ्याभोवती ओढणी आवळल्याचे दिसून येत असल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून परिसरात चौकशी तसेच मृत तरुणीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बिटरगाव (वां) आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.