Accident file photo
सोलापूर

Solapur Accident : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा, तर कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

दोन्ही घटनांची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहर परिसरात मंगळवारी (दि. १५) घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत २३ वर्षीय तरुणासह ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. होटगी-टिकेकरवाडी दरम्यान रेल्वेच्या धडकेत तरुणाचा, तर होटगी रोडवरील किनारा हॉटेलजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निखील संतोष धाकतोडे (वय २३, रा. डोणगाव, ता. उत्तर सोलापूर) हा मंगळवारी सायंकाळी होटगी ते टिकेकरवाडी दरम्यान रेल्वे रुळावर पोल क्रमांक ४६३/२७ ते २९ दरम्यान जखमी अवस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत त्याच्या शरीराचा कमरेपासून खालचा भाग वेगळा झाला होता. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निखीलला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

दुसऱ्या घटनेत महादेवी शिवाजी कोरे (वय ७३, रा. राहुल नगर, मजरेवाडी, सोलापूर) या होटगी रोडवरील किनारा हॉटेलजवळ पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचीही नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT