मंगळवेढा, पुढारी वृत्तसेवा : वीजेच्या खांबावर चढून काम करीत असताना खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील हुन्नूर हद्दीत घडली. हनुमंत दिलीप गुजले (वय ३४ रा.भोसे) मयत झालेल्या वीज कामगारांचे नाव असून याची खबर सुरेश पांडुरंग गुजले (वय 38 रा. भोसे) यांनी दिली. बुधवारी दि. २१ रोजी स. ११ वाजण्याच्या सुमारास हुन्नूर गावच्या हद्दीत इंगोले यांच्या शेताजवळ विजेचे काम करण्यासाठी हनुमंत दिलीप गुजले हा विजेच्या खांबावर चढला असता त्यास भगीरथ वरून वीजपुरवठा केलेल्या विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची खबर समजताच घटनास्थळी नातेवाईक व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक नयोमी साटम हजर झाल्या यावेळी मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास लागल्याशिवाय मृतदेह जाग्यावरून हलण्यास नातेवाईकांनी विरोध केला. यावेळी पोलीस निरीक्षक साटम यांनी तुमचे काय म्हणणे असेल तर द्या असे सांगत नातेवाईकांची समजूत काढून सदरचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र भोसे येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बाळू चोरमले व निंबोणी शाखेचे शाखा अभियंता आसबे हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी सदर कामासाठी खांबावर चढण्यासाठी कोणी प्रवृत्त केले व या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याचे परमिट घेतले होते का? आदी कारणावरून प्रश्नांची सरबत्ती करत याच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न हनुमंत गुजलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला.