कुर्डूवाडी : कुर्डू (ता.माढा) येथील राखीव वनक्षेत्रातून तीन जेसीबी, सात टिप्पर दिवस रात्र मुरूम उपसा करत होते. वन विभागाच्या अधिकार्यांनी यातील एक जेसीबी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र महिलांना पुढे करून चालकाने जेसीबी पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. याबाबतची माहिती वन विभागाने खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांनी दिली.
वनपरिक्षेत्र कार्यालय मोहोळ येथील वन विभागाला कुर्डू (ता. माढा) येथील गट नंबर 551 व 567 या राखीव वनक्षेत्रातून तीन जेसीबी तसेच टिप्पर बेकायदेशीरपणे दिवस रात्र मुरमाचे उत्खनन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार 27 जून रोजी मोहोळचे वनपाल तसेच मोडनिंब वनरक्षक तसेच कामती, पोखरापूर, जेऊर, माढा या सर्व अधिकार्याने मिळून कुर्डू येथील राखीव वनातून होत असलेल्या मुरूम चोरीची पाहणी केली असता त्यांना गट क्रमांक 551 मधून एक जेसीबी (क्र. एम एच 17 सी आर 328) मुरमाचे उत्खनन करत असताना आढळून आला.
यानंतर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना सर्व वन अधिकार्यांनी भेटून हा प्रकार सांगितला. त्यांनी बीट अंमलदार तसेच गावातील पोलीस पाटील यांना जाऊन पंचनामा करण्यास सांगितले. गट क्रमांक 551 मध्ये पंचनामा केला असता 24 हेक्टर राखीव वनक्षेत्रातून 45 हजार घनमीटर मुरूम चोरल्या बाबतचा पंचनामा केला.
या बाबतची फिर्याद देण्यासाठी मोडनिंबचे वनरक्षक कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गेले असता ठाणे अंमलदार ए. बी. डोळे यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला. यानंतर वन विभागाचे सर्व अधिकारी ग्रामीणच्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे गेले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनरक्षक अविनाश गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला. आरटीओ अकलूज व सोलापूर यांच्याकडून त्या जेसीबी च माहिती मागविण्यात आली.
रहिवाशांची अधिकार्यांना दमदाटी
वन विभागाच्या अधिकारी जेसीबी ताब्यात घेऊन जात असताना राखीव वनक्षेत्रा शेजारी राहणार्या चार ते पाच पुरुष व तीन ते चार महिलांनी एकत्र येऊन वन अधिकार्यांना दमदाटी करून तो जेसीबी चालकाला पळवून नेण्यास मदत केली .