संतोष चितापुरे
सोलापूर : भारतीय महिला संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करत क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताच्या महिला संघाने यापूर्वी दोनवेळा अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र, रविवारी हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने विश्चचषकाच्या जेतेपदाचा हा दुष्काळ संपवला. हा विजय खासच आहे, अश्या भावना सोलापुरातील महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या.
या विजयाबद्दल भारताच्या लेकींचे सोलापुरकरांनी मनापासून अभिनंदन केले. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भारताच्या प्रतिकाला दुखापत काय झाली, शेफाली वर्मा टीम इंडियाचा भाग काय झाली, आणि फायनलची हिरो काय बनली!
शेफालीने तगडी सुरुवात तर करुन दिलीच, पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीच बॉलिंग न केलेल्या या धाकड शेफालीने दोन मेजर विकेटस् काढून गेम चेंज केला, अशा भावना सोलापुरातील महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या. तुमच्यामुळे संपूर्ण देशाचा उर अभिमानाने भरुन आला आहे, असे त्यांनी सांगितले. महिलांची क्रिकेट सामना म्हटलं की, त्याला दुय्यम स्थान मिळत असे मात्र या विजयामूळे क्रीडा विश्वातील मानसिकतेत निश्चितच बदल घडेल आणि महिला खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळेल, असा विश्वासही सोलापूरच्या महिला क्रिकेटपटूंनी व्यक्त केला.
मी स्वतः हरमनप्रीत कौरबरोबर 2009 मध्ये ऑस्ट्रोलियात झालेला वर्ल्ड कप खेळला आहे, तेव्हापासून ही स्पर्धा जिकण्याचे स्वप्न होते. रविवारी भारताच्या मुलींनी जबरदस्त कामगिरी केली. हा विजय प्रेरणादायी आहे. खूप आनंद होत आहे.अनघा देशपांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयामुळे इतिहास घडला आहे, ज्याची 52 वर्षांपासून प्रतीक्षा होती. आमचा आनंद गगनात मावेना. भारताला मोठा मान मिळाला आहे. भारतीय मुलींना क्रिकेटमध्ये भरपूर वाव आहे.किरण मणियार, माजी रणजीपटू, सोलापूर
भारताच्या मुलींनी इतिहास रचला. इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमाला अखेर प्रत्यक्षात उतरताना पाहून एक भारतीय म्हणून मला फार अभिमान वाटत आहे. या विजयामुळे समाजाचा दृष्टीकोन निश्चितच बदलेल. आजच्या विजयामुळे नवीन पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल.स्वरूपा कदम, महिला प्रशिक्षक