सोलापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांसाठी प्रसूती साहाय्य ही योजना पुन्हा सुरू केली आहे. पात्र महिलेला नैसर्गिक किंवा सिझर प्रसूती झाली तर २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. प्रसूतीनंतर एका वर्षातच अर्ज करावा लागणार आहे.
नॉर्मल तसेच सिझेरियन प्रसूतीसाठी समान मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महिला बांधकाम कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. प्रसूतीनंतर महिलांना काही काळ काम करता येत नाही. यामुळे या कुटुंबाला याच कालावधीत आर्थिक फटका सहन करावा लागतो. आईसह नवजात बालकाच्या आरोग्याची योग्य काळजी घेता यावी. यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. माता व बालकांचे पोषण सुधारावे, कुपोषण टाळता यावे आणि प्रसूतीनंतर महिलेला आवश्यक आर्थिक आधार व्हावा. म्हणूनच ही योजना आणली आहे. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने १३ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे मंडळाकडे नोंदणी असलेल्या व पात्र महिला बांधकाम कामगारांना याचा लाभ घेता येणार आहे.
हा लाभ पहिल्या दोन आपत्यांच्या प्रसूतीसाठी मर्यादित आहे. लाभासाठी 'महाबोकडब्ल्यू' या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कामगाराची शासनाकडे नोंदणी असणे गरजेचे आहे. तसेच प्रसूत झालेल्या महिलेचे वय १८ ते ६० वर्षे या दरम्यान असावे व अर्ज करण्यापूर्वीच्या १२ महिन्यांत किमान २० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. या योजनाबाबतच्या सूचना कार्यालयांना प्राप्त होताच कार्यालयीन स्तरावरून या योजनेच्या लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनेचा हजारो महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे.- मंगेश झोले, सहायक कामगार आयुक्त