सोलापूर : अक्कलकोट बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन संशयित महिला आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या महिलांकडून दोन लाख २७ हजार रुपयांचे १५ ग्रॅम ४५० मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकास दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करताना अक्कलकोट बस स्थानकावरून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला कुंभारी बस स्थानकावर थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार तात्काळ कुंभारी टोलनाक्यावर सापळा रचून चंद्रकला नितीन कांबळे (वय ३०) आणि नंदा नागनाथ पाथरे (वय ६५, दोघी रा. लक्ष्मी माता मंदिर, लिंबेवाडी, सोलापूर) या दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्यांनी जुलै आणि ऑगस्ट २०२६ दरम्यान अक्कलकोट बस स्थानकावर चोऱ्या केल्याची कबुली दिली. या महिलांच्या चौकशीतून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले. या दोन्ही गुन्ह्यातील दोन लाख २५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम ४५० मीली सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड, खलील बागवान, हरीदास पांढरे, विरेश चलशेट्टी, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, कपिल काटकर, योगेश जाधव, सुनिल पवार, दिपाली जाधव, सुनंदा झळके यांच्या पथकाने केली.