सोलापूर

Solapur Gastro Death Case: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये

गॅस्ट्रोनेच झाला त्या महिलेचा मृत्यू, रहिवाशांच्या संतप्त भावना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आसरा चौकाजवळील एसबी प्लाझामध्ये गेल्या आठवड्यापासून अनेकजण उलटी, जुलाबाने त्रस्त आहेत. यातच गुरुवारी एका महिलेचा मृत्यू झाला. परंतु महानगरपालिका प्रशासन ती आमची पाईपलाईन नाही, त्यांचे स्वतंत्र बोअर आहेत, असे म्हणत जबाबदारी टाळण्याचे काम करत आहे.

आफरीन शेख असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. उलटी जुलाब आणि गॅस्ट्रोनेच मृत्यू झाला असे त्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे. त्यांच्यावर यशोधरा हॉस्पिटलमध्ये मागील तीन दिवसांपासून उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. एसबी प्लाझा या इमारतीमध्ये इमारतीचे स्वतंत्र तीन बोअर आहेत. या बोअरच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ही ड्रेनेजलाईन तुटलेली आहे, असे वारंवार या रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनास सांगितले होते. परंतु महापालिकेने दुर्लक्ष केले असेही त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. या इमारतीमध्ये त्यांचे स्वतःचे बोअर आहेत.
- रामचंद्र पेंटर, सार्वजनिक आरोग्य उपअभियंता
संबंधित महिलेचा मृत्यू अतिसाराने झालेला असला तरी तेथील नागरिक जे पाणी वापरतात ते महानगरपालिकेचे नाही. त्यांचे स्वतंत्र बोअर आहेत. परंतु घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी भेट देत सुरक्षात्मक उपाययोजना तसेच औषध गोळ्यांचे वाटपही आम्ही या इमारतीतील नागरिकांना केले होते.
-डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT