अंजनगाव खेलोबा : संकटावर मात करुन पुन्हा जिद्दीने आयुष्यात उभे राहण्याची उदाहरणे आपण नेहमीच एकत आलो आहोत. असाच एक जिद्दीचा प्रवास सुरु केला आहे. सोनाली धनाजी पाटेकर यांनी. त्या गेल्या चार वर्षापासून अंजनगाव (खे) च्या परिसरातील गावांना स्वत: छोटा हत्ती वाहन चालवून मजूर वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत.
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील धनाजी पाटेकर हे टमटम मधून शेतीसाठी लागणारे महिला मजूर वाहतूक करुन आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. या व्यवसायावरच त्यांचा संसार आणि दोन मुलांचे शिक्षण सुरू होते.मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांना मणक्याचा त्रास जाणवू लागला. हा त्रास वाढतच गेला. सांगलीतील रुग्णालयात त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामूळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
घरात कमावणारे कोणीच नाही. संसार खर्च भागवून दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे अत्यंत जिकिरीचे झाले. मात्र धनाजी यांच्या पत्नी सोनाली यांनी परिस्थिती पुढे हात न टेकता पतीचा व्यवसाय स्वतः करायचे ठरवले. आणि चक्क त्या टमटम चालवून मजूर वाहतुकीचा व्यवसाय करू लागल्या. गेल्या चार वर्षांपासून अनगर, खैराव, वडशिंगे आणि आसपासच्या गावातील शेतकर्यांना महिला मजूर पुरवण्याचे काम त्या करत आहेत. समाजामध्ये आज या ना त्या किरकोळ कारणांवरून आत्महत्येसारखे शेवटचे टोक उचलण्याचे प्रकार वाढत असताना सोनाली पाटेकर यांनी केलेले हे कृत्य खरोखरच महिलांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. धनाजी यांच्या जीवनामध्ये खरोखरच त्या आधुनिक सावित्री बनून आल्या आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धनाजी पाटेकर यांना शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या संसाराची घडी विस्कटण्याची भीती होती. त्यामुळे सोनाली यांनी धनाजी यांच्याकडून सराईतपणे ड्रायव्हींग शिकून घेतले. शस्त्रक्रियेनंतर धनाजी दररोजच्या कामातून जायबंद झाले. सोनाली यांनी स्वत: गाडी चालवून मजूर पुरविण्याचे काम सुरु ठेवले. त्यांचा एक मुलगा अभियांत्रिकी महाविद्यालयात तर छोटा मुलगा नववीत शिक्षण घेत आहे.