अंदेवाडी (ता. अक्कलकोट) : येथे ऐन पूरस्थितीत नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News: रस्ते बंद; टँकरद्वारे पाणीपुरवठा

अक्कलकोट तालुक्यातील चित्र; पंचनामे होऊनही मदत नाही

पुढारी वृत्तसेवा

मैंदर्गी/दुधनी : अक्कलकोट तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर काही गावाचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे.

घोळसगावच्या चारही बाजूचे रस्ते पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याची काम झाले नसल्याने अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे तत्काळ काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अक्कलकोट तालुक्यात बोरी नदी व भीमा नदी या दोन्हीही पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये, शेतामध्ये पाणी साठून राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचेही या ठिकाणी मोठे हाल होत आहे. पाहावे तेथे पाणीच पाणी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. पंचनामे केले जात असलेतरी प्रत्यक्षात हातामध्ये कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे .

शक्य त्या गावांमध्ये वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने अन्नधान्याचे किट, चादरी, औषधांचेे वाटप करण्यात येत आहे. घोळसगाव येथे चारी बाजूने रस्ता बंद असल्यामुळे गावातील रुग्णांना बाहेर घेऊन जाता येत नाही. गर्भवती स्त्रियांचे हाल होत आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या ठिकाणी मिळत नसल्याची खंत सरपंच राजशेखर किवळे यांनी व्यक्त केली.

चार दिवसांपासून ठिक-ठिकाणचे रस्ते बंदच

कुरनूर धरणातू पाणी सोडल्याने उमरगे येथील पुलावर पाणी आले आहे. गाणगापूरकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. मैंदर्गी, दुधनी आदी भागातून व्यवसाय व कामाकरिता अक्कलकोटकडे येणारा वर्ग मोठा आहे . मागील तीन - चार दिवसापासून रस्ता बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे देखील हाल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT