सोलापूर

Solapur Water Supply : सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी १,३५० कोटींच्या खर्चास मान्यता

जलशुद्धीकरणाची दोन केंद्रे, ३० जलकुंभ, १,२२७ किलोमीटर जलवाहिन्यांचे जाळे उभारणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरवरील पाणी टंचाईचा शिक्का पुसून शहरास दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी व्यवस्था उभी केली जाणार आहे. यासाठी तब्बल एक हजार ३५० कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा सुधारित योजनेला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आ. देंवेद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला. या योजनेमुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण केले जाणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले. ही कामे करताना रस्त्यांचे उत्खनन झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून रस्त्यांची कामे पूर्ववत करून दिली जाणार आहेत.

८० कोटींचा सौरऊर्जा प्रकल्पही उभारणार

पाणीपुरवठा योजनेला सौरऊर्जेची जोड देण्यात येणार आहे. केगाव, शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या सर्वे क्रमांक २७ व २८ मधील २०.६ हेक्टर जागेवर १३ मेगावॅट डीसी आणि १० मेगावॅट एसी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे ८० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा यंत्रणेसाठी लागणाऱ्या विजेच्या खर्चात २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जलशुद्धीकरणाची दोन केंद्रे उभारणार

या योजनेंतर्गत १२० एमएलडी आणि ३० एमएलडी क्षमतेची नवीन दोन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे एकूण १५० एमएलडी क्षमतेची नवीन जलशुद्धीकरण सुविधा उपलब्ध होईल. पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ३० नवीन उंच जलकुंभ आणि १० एमबीआर टाक्या उभारण्यात येणार आहेत.

आमदार देशमुख, कोठेंचाही उल्लेख

पालकमंत्री गोरे यांनी ही योजना पूर्ण होण्यासाठी शहरातील आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हा विषय लावून धरल्याचे सांगत अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT