सोलापूर : शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणारी तब्बल 1400 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सोमवारी (20 एप्रिल) झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर एकमताने मंजूर करण्यात आली. सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण असतानाही ही योजनेचा सत्ताधारी भाजपाच्या वतीने या योजनेस मंजुरीच्या टप्प्यावर नेण्यात यश मिळवले.
शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. सध्या सोलापूरकरांना अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी 1400 कोटीची पाणीपुरवठा योजना साकारण्यात येत आहे. 30 वर्षाचा विचार करून लागणारे पाणी या योजनेच्या माध्यमातून उपल्बध होणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून सुमारे 600 कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार असून, उर्वरित निधी महापालिकेचा हिस्सा, तसेच कर्जरोखे (बॉण्डस्) आणि इतर आर्थिक स्रोतांद्वारे उभारला जाणार आहे.
मात्र, जागतिक बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मालमत्ता कर प्रणालीत सुधारणा, सर्व मालमत्तांची नोंदणी आणि बिलिंग व्यवस्था सक्षम करणे यांचा समावेश आहे. या अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. सभेदरम्यान या योजनेचे सादरीकरण करण्यात आले, मात्र काही नगरसेवकांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. तरीही, शहराच्या भविष्यासाठी योजना आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत अखेर सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
अशी आहे योजना
जलशुद्धीकरण केंद्र 150 एमलएलडी 40 कोटी 11 लाख
शुद्धीकरण फिडर मेन लाईन 77.8 कि.मी. 204 कोटी 24 लाख
उंच पाण्याच्या 30 टाक्या 63.03 कोटी
1117 किलोमिटर वितरण लाईन 261 कोटी 24 लाख
2 लाख 48 हजार मिटर बसवणे 55 कोटी 50 लाख
सौर ऊर्जा प्रकल्प 49 कोटी 43 लाख
रस्ते दुरुस्ती 149 कोटी
यांत्रिक व इतर कामे 89 कोटी