सोलापूर : भर उन्हाळ्यात टंचाईने हैराण झालेल्या सोलापूरकरांवर पुन्हा एकदा संकट कोसळले असून, महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला गळतीचा मोठा फटका बसला. जुळे सोलापुरातील एमबीआर पाण्याच्या टाकीवरून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला आसरा परिसरालगत कल्याणनगर येथे गळती लागल्याने शहर पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले.
या गळतीची दुरुस्ती शुक्रवारी (दि. 10) हाती घेण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी रेल्वे सिग्नल यंत्रणेची केबल जवळच असल्याने काम अत्यंत सावधगिरीने करावे लागणार आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिराने होणार असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, अपुऱ्या, विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. तरी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम नेमके किती काळ चालणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती दिलेली नाही. यामुळे आधीच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढलेली असताना नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.