लऊळ : येथील पडसाळी सबस्टेशनवर खंडित आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या विजपुरवठ्याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी दिवसभर आंदोलन केले. सबस्टेशनचे कार्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना घेराव घालून विविध प्रश्नांचा भडीमार केला. पालकमंत्री गोरे यांच्या मध्यस्थीलाही यश आले नाही.
कमीत कमी पाण्यात शेतकरी पीक जिवंत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना अनियमित आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. गुरुवार सकाळी पडसाळी सबस्टेशन येथे संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन बंद करण्याचा प्रयत्न केला.महावितरणचे अधिकारी दाखल होताच आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची धांदल उडाली.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे पंचवीस आम्पियर झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित होत असल्याने सदरचा शासनाचा आदेश दाखवण्याची मागणी केली असता तसा कोणताही शासनाचा आदेश नसताना वरिष्ठांच्या संगण्यावरून असे केले जात असल्याचे सांगण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार )जिल्हा सरचिटणीस विष्णू नलवडे, भारत यादव, सरपंच योगेश पाटील, अविनाश निकम, धनंजय नलवडे, कल्याण गाडे,धनाजी गवळी, वैजिनाथ भोंग, भास्कर गाडे,गणेश लोकरे, यांच्यासह लऊळ, उजनी, भुताष्टे, पडसाळी या गावाचे शेतकरी उपस्थित होते.
पडसाळी सबस्टेशनवरच हा अन्याय का?
लऊळ, उजनी, पडसाळी, भुताष्टे ही चार गावे पडसाळी सबस्टेशनला जोडली आहेत. फक्त या चार गावातच अपुरा आणि अपुऱ्या दाबाने विजपुरवठा होतो.आसपासच्या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.त्याठिकाणी कशी सिंगल आणि थ्री फेज सुरुळीत सुरु आहे. पडसाळी सबस्टेशनवर हा अन्याय का असा सवालही यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्र्यांशी चर्चा ठरली निष्फळ
सदरचे आंदोलन सुरु असताना आंदोलनकर्ते शेतकरी आणि अधिकारी यांच्या चर्चेतून मार्ग निघत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करून महावितरणचे अधिकारी यांच्याशी बातचीत केली असता आम्ही सदरच्या मागण्या पूर्ण करू शकत नसल्याचे म्हटले त्यामुळे पालकमंत्री गोरे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली.
मुजोर कर्मचाऱ्यांना जागेवर झापले
आंदोलन सुरु असताना एका शेतकऱ्याने महावितरण कर्मचारी कामासाठी पैसे मागत असल्याचे सांगीतले संबंधित कर्मचाऱ्याला अधिकारी जाधव यांनी जागेवर झापले. याशिवाय इतर मुजोर कर्मचारी यांना देखील तंबी देण्यात आली.