mango trees  
सोलापूर

Solapur Water Crisis: पाण्याअभावी आंब्यांची दोन हजार झाडे जळाली

अरणमधील घटना; सीना-माढा योजनेच्या कॅनॉलला पाणी सोडलेच नाही

पुढारी वृत्तसेवा

कुर्डूवाडी : अरण ते पडसाळी (ता.माढा) या दरम्यान सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलला पाणी न आल्यामुळे दत्तात्रय घाडगे यांची अरण येथे असलेली 10 हजार आंब्याच्या बागेतील दोन हजार झाडे अक्षरशः पाण्याअभावी जळून गेली आहेत. त्यांनी कॅनॉलला सर्व नेतेमंडळीना पाणी सोडायची मागणी केली होती परंतु एक थेंबही पाणी पाटबंधारे विभागाने सोडले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

अरण या गावी अक्षरशः माळराना वरती दत्तात्रय घाडगे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली. येथे त्यांनी दहा हजार आंब्यांची झाडे व इतर झाडांची सावता आंबा बाग फुलवली आहे. या आंब्याच्या बागेत तीन किलोचा शरद आंबा व दोन किलोचा सावता आंबा हे नवीन वाण त्यांनी शोधून काढले आहे. याचे त्यांनी पेटंट घेतलेे आहे. हा आंबा पाहण्यासाठी शरद पवार यांच्यासह विविध नेते मंडळींनी त्यांच्या बागेमध्ये हजेरी लावली होती .

जेव्हा पाण्याची आवश्यकता नसते तेव्हा पाटबंधारे विभाग या कॅनॉलला पाणी सोडतो परंतु उन्हाळ्यात पाणी सोडले जात नाही हे दरवर्षीचे वास्तव आहे पाणीपट्टी मात्र शेतकऱ्यांकडून वसूल केली जाते. भारत देशातील एकमेव होमिओपॅथिक औषधे द्वारे घेतलेल्या घाडगे यांच्या आंब्याच्या बागेतील दोन हजार झाडे पाण्या अभावी जळून गेली आहेत. पाण्याअभावी आंबे मोठे होण्याचे प्रमाणही कमी झालेे आह . घाडगे यांच्यासह या भागातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्वांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा तरीही पाणी नाही

सीनामाढा उपसा सिंचन योजनेमध्ये अरण या गावाला जो कॅनॉल येतो तो कॅनॉल पडसाळीला पुढे जातो व हे शेवटचे क्षेत्र आहे. एप्रिल महिन्यात येथे पाणी सोडावे म्हणून अनेक नेते मंडळींनी शासन दरबारी आवाज उठवला. पडसाळी येथे कोरड्या कॅनॉलमध्ये अनेकांनी उड्या टाकल्या परंतु पाटबंधारे विभागाला घाम काही आला नाही. अरण येथे अनेक नेतेमंडळी आहेत त्यांनाही येथे पाणी आणणे शक्य झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT