सोलापूर

Solapur News : जाती-पातीच्या भिंती भेदून अख्खं गाव बसलं एकाच पंगतीत

'भाळवणी'करांनी घडवला इतिहास; भव्य 'गाव जेवण' सोहळा; ४९ ग्रामस्थांचा वारकरी टोपी घालून अनोखा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात, जिथे एकाच घरात राहणारी माणसे मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधायला विसरली आहेत. तिथे मंगळवेढा तालुक्यातील ‘भाळवणी’ गावाने संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल, असा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. गावात सामाजिक सलोखा आणि हरवत चाललेला आपुलकीचा संवाद पुन्हा जिवंत करण्यासाठी सरपंच लक्ष्मण गायकवाड यांच्या संकल्पनेतून नुकतेच एका भव्य आणि ऐतिहासिक 'एकत्रित गाव जेवण' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे गावकऱ्यांमधील परस्परांवरील प्रेम, स्नेह आणि बंधुभाव कमालीचा घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले.

'मुख्यमंत्री पंचायत राज ग्रामसमृद्धी अभियाना'मध्ये भाळवणी गावाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, त्याअंतर्गत गावात सातत्याने नवनवे उपक्रम राबवले जात आहेत. याच कडीत या गाव जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, जेवणाचा बेत ठरवण्यापासून ते प्रत्यक्ष स्वयंपाक करण्यापर्यंत आणि तो वाढण्यापर्यंत गावातील अबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. या ऐतिहासिक स्नेहभोजनासाठी गावातील प्रत्येक घरातून सढळ हाताने मदत करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आणि मनाला भिडणारे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व जाती-धर्माचे, पंथाचे आणि विविध आर्थिक स्तरांतील नागरिक कोणत्याही भेदभावाशिवाय एकाच पंगतीत शेजारी-शेजारी जेवायला बसले होते. उच्‍च-नीच, गरीब-श्रीमंत या भिंती बाजूला सारून गावकऱ्यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गावातील ज्या ४९ ग्रामस्थांचा नुकताच वाढदिवस होऊन गेला होता. अशा सर्व ४९ जणांना एकत्र बोलावून, त्यांना सन्मानाची वारकरी टोपी आणि पांढरा शेला (पंचा) परिधान करून त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. या अभूतपूर्व दृश्याने संपूर्ण पंचक्रोशीत एकतेचा आणि समतेचा संदेश दिला.

या सोहळ्याला भाळवणीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सानिया तांबोळी, छत्रपती परिवाराचे सुरेश पवार, पांडुरंग चौगुले, चंद्रकांत मोरे, सीताराम भगरे, तानाजी आवळेकर, शिवाजी दोडके, वसंत माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग आणि तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT