सोलापूर

Solapur News: वैराग भागात सोयाबीन, मूग, उडीद करपले

विहिरी, नदी, नाले आणि जलसाठ्यांवरही परिणाम

पुढारी वृत्तसेवा
काशीनाथ क्षीरसागर

वैराग : पावसाळ्याला जवळपास अडीच महिने उलटून गेले असतानाही बार्शी तालुक्यासह वैराग भागातील दहिटणे, मुंगशी, सासुरे, राळेरास, शेळगाव, तडवळे, यावली, ढोराळे, इर्ले आदी गावांत अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर रोटर फिरवला आहे त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.

दमदार पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी उशिराने खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतांमध्ये उडीद व सोयाबीनची पिके आता फुलोऱ्यात आली आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून सोयाबीन, मूग, उडीद करपले आहे.

ज्या आभाळाकडे पाहून बळीराजा आपल्या पिकांच्या हिरवाईत सुख शोधत होता, त्याच आभाळाने ऐन पावसाळयात पाठ फिरविली. आता त्याच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतातील उभे पीक तहानेने माना टाकत आहे, बांधावरचे हिरवे गवत वाळत आहे आणि गोठयातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. पाणी पातळीही दिवसेंदिवस घटत चालल्यामुळे दुष्काळाची तीव्रता पावसाळ्यातच भीषण बनू लागली आहे. त्यामुळे सिंचनासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे बार्शी तालुक्यातील बळीराजाच्या काळजाला छेद देत आहे.

पावसाअभावी विहिरी, नद्या-नाले आणि जलसाठ्यांवरही परिणाम होत असून पाणीपातळी घटत चालली आहे. ग्रामीण भागात सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. काही भागांत शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येत आहे. बार्शी तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतीचा तातडीने दौरा करून पिकांची पाहणी करावी, पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीक विमा, नुकसानभरपाई तसेच दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यातअशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यां मधून होत आहे.

सध्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र आहे. आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून कृषी अहवाल तयार करीत आहोत. हा अहवाल शासनाकडे पाठविणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कोणतीही सोय नाही, त्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शेतकऱ्यांची ही गंभीर परिस्थिती समोर येत आहे.
- संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी
सुरुवातीच्या काळात हलका पाऊस झाल्याने तसेच पुढील मोठ्या पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. पिकांची वाढही चांगली झाली होती. मात्र दीड महिने पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन करपू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांवर रोटर फिरवण्याची वेळ आली आहे. शासनाने त्वरीत आदेश देऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनाने तत्काळ करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
-प्रताप क्षीरसागर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT