Solapur Leopard News | वाघोली शिवारात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 
सोलापूर

Solapur Leopard News | वाघोली शिवारात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन विभागाला पाचारण; शेतकऱ्यांना शेतात न जाण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

माळीनगर : मौजे वाघोली (ता. माळशिरस) येथील शेतशिवारात गुरुवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, अकलूज पोलिस तसेच प्रशासनाला कळविण्यात आले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शेतकरी विठ्ठल सदाशिव पाटोळे यांच्या शेतातील घराशेजारील वावरात रात्री साधारण साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान बिबट्या आढळून आला. पाटोळे यांच्या शेतालगत शेळीपालनाचा गोठा असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्या या परिसरात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, प्रा. प्रशांत मिसाळ हे अकलूजहून वाघोलीकडे चारचाकी वाहनाने येत असताना वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना बिबट्या स्पष्टपणे दिसला. त्यांनी तत्काळ या घटनेचे चित्रीकरण करून गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच गावचे पोलिस पाटील प्रदीप मिसाळ यांनी वन विभाग, अकलूज पोलिस तसेच प्रांत अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. वन विभागाच्या पथकाकडून परिसराची पाहणी करण्यात येणार असून बिबट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा ऊस क्षेत्रात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभाग किंवा पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT