सोलापूर : सोलापूर शहरासह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा तालुक्यांत सोमवारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मैंदर्गी येथे सायंकाळी गारांचा पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील मे महिन्यापासून नैसर्गिक आपत्ती बळीराजाचा पिच्छा सोडत नसल्याने बळीराजा सैरभैर झाला आहे.
हवामान विभागाने येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सोमवारी पहाटेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. मंद्रुप परिसरात कडक जमिनीवर पाणी वाहील इतका पाऊस पडला. ज्वारी जमीनदोस्त झाल्याने काढणीला आलेल्या कणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरभरा पिकांचेही नुकसान झाले आहे.
मे 2025 ते ऑक्टोबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अवकाळीसह मान्सून पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी आणि भीमा, सीना नदीला महापूर आल्याने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई तर द्राक्ष, खरबूज, कलिंगड या सारखी नगदी पिके अवकाळी पावसाला बळी पडत आहेत.
द्राक्ष घड सडण्याची भीती
अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरून द्राक्षाची मणी कुजण्याची भिती निर्माण झाली आहे. सोमवारच्या अवकाळी पावसाचा काही ठिकाणी असा फटका बसला आहे.
ज्वारी काळवंडणार
काढणीला आलेले ज्वारीचे कणीस अवकाळी पावसात भिजल्याने आता मळणी झाल्यानंतर ज्वारी काळवंडून गुणवत्ता कमी होणार आहे. कडब्याचाही नुकसान झाला आहे. काढणीला आलेला गहू पावसात भिजल्याने ग्ाव्हातील चिकटपणावर दुष्यपरिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष बाग तोट्यातच आहे. गेल्या वर्षी द्राक्ष आणि मनुकांना भाव होते. परंतू शेतकऱ्यांकडे माल नव्हता. यंदा कसेबसे खर्च करुन द्राक्ष बाग फुलविली. परंतू सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी.शंकरलिंग कुंभार, द्राक्ष उत्पादक