सोलापूर : बेरोजगारी, अस्थिर खासगी नोकऱ्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे तरुणांचे लग्न जुळत नाही. त्यातच विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून प्रचंड लूट होत आहे. याविरोधात लग्नाळू तरुण १० सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शांततेत बसून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. लग्न योग्य वयात व्हावे, फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आम्ही लग्नाळू युवक येतोय सोलापूर जिल्हा परिषद समोर.. लग्नाळू तरुणांनो, शांततापूर्ण निषेधासाठी एकत्र या... अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाचे प्रमुख किसनदेव ननवरे यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अथवा स्थिर नोकरी असलेला वर हवा, अशी अपेक्षा केली जात असल्याने बेरोजगार तसेच खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे लग्न न होण्याच्या समस्येची नेमकी व्याप्ती समोर आणण्यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणी ननवरे यांनी केली.
विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून अविवाहित तरुणांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पैसे उकळत आहेत. याविषयी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना देेणार आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्व धर्मीय अविवाहित तरुण-तरुणींची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू करावी
सरकारी विवाह नोंदणी पोर्टल निर्माण करावे
विवाह इच्छुक तरुणांना पाच लाखांचे पॅकेज द्यावे