सोलापूर

Solapur University : दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर : ‘बालाजी अमाइन्स उद्यम प्रेरणा केंद्रा’च्या इमारतीचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विद्यापीठात सुरू करण्यात येत असलेले ‘बालाजी अमाइन्स उद्यम प्रेरणा केंद्र’ ही काळाची गरज ओळखून टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यापीठात दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या सीएसआर निधीतून तसेच उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ‘बालाजी अमाइन्स उद्योग प्रेरणा केंद्रा’च्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी झाले. यावेळी कुलगुरू कर्नल डॉ. महानवर बोलत होते.

यावेळी बालाजी अमाइन्सचे संचालक एन. राजेश्वर रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, गारमेंट असोसिएशनचे अमित जैन, आर्किटेक्ट मनोजकुमार मर्दा, डॉ. राजेश गुराणी उपस्थित होते. डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अमित जैन यांनी आभार मानले.

उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे एवढेच विद्यापीठाचे काम नसून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविणे हीदेखील विद्यापीठाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टीने बालाजी अमाइन्ससारखा उद्योग समूह पुढाकार घेत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रेरणा मिळेल.

१०० एकर क्षेत्रात मका पेरणी करणार

विद्यापीठ परिसरात पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या १०० एकर क्षेत्रात मका पेरणी करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून उत्पादित होणारी मका जनावरांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT