सोलापूर : दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी (दि. ३०) राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दुष्काळ : वास्तव, आव्हाने आणि उपाययोजना’ या संकल्पनेवर आधारित परिषदेत पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह जलव्यवस्थापन, कृषी आणि अर्थकारण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हिवरे बाजारच्या माध्यमातून जलसंधारण आणि ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणारे पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत.अनियमित पाऊस, घटती भूजल पातळी, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळाचे कृषी, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय पैलू विचारात घेऊन उपाययोजना निश्चित करण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. वसंतराव जुगले, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, डॉ. बाळ राक्षे, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, डॉ. स्वाती संतोष थिटे आणि प्रगतशील शेतकरी विश्वासराव कचरे व बालाजी लोहकरे सहभागी होणार आहेत.
परिषदेतील चर्चेच्या आधारे तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन धोरणात्मक शिफारशींचा समावेश असलेला कृतीशील अहवाल तयार करून राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
जलसंधारणापासून शाश्वत उपाययोजनांपर्यंत
दुष्काळाचे बदलते स्वरूप, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम, भूजल पातळीतील घसरण, जलस्रोतांचे व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार दुष्काळ निवारणासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.