सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पर्यावरण रक्षणासाठी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. विद्यापीठाच्या 482 एकर विस्तीर्ण परिसराध्ये एनएसएस, विद्यार्थी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आगामी काळात 5 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार झाडे प्रत्यक्षात लावली आहेत. उर्वरित उद्दिष्टपूर्ती चालू वर्षभरात होईल, असे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.
राज्यातील विद्यापीठाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी वृक्षलागवड मोहीम आहे. या मोहिमेत केवळ जंगली झाडेच नव्हे, तर आंबा, पेरू, जांभूळ यांसारखी फळझाडेही लावण्यात आली आहेत. यामागे विद्यापीठाचा दुहेरी उद्देश असून, फळझाडांपासून आर्थिक उत्पन्न मिळवणे आणि जंगली झाडांनी वाढलेले तापमान कमी करणे कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग ही मोहीम राबवत आहे. ज्यात विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच, दत्तक घेतलेल्या गावांमध्येही वृक्षारोपण करून ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून केला जात आहे.
या वृक्षारोपणांचा असा होणार फायदा
विद्यापीठाने फळझाडांची लागवड करून आर्थिक स्वावलंबन साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे विद्यापीठाला उत्पन्न मिळेल. जंगली झाडे लावून सोलापूरचे तापमान कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचसोबत सोलापूरच्या पर्यावरणालाही मोठा फायदा होईल. त्यामुळे तापमान 2-3 टक्क्यांनी कमी होणार आहे.
झाडांची निगा राखणारे 10 कर्मचारी
कुलगुरुंनी 482 एकर परिसरामध्ये दहा कर्मचारी नेमले आहे. दररोज या सर्व झाडांची काळजी घेण्यासाठी यांना दररोज सकाळी मार्गदर्शन करण्यात येते. या कर्मचार्यामुळे 99 टक्के झाडे जगलेली आहेत. अतिशय उत्तमपणे झाडांची देखभाल करतात. सर्व झाडे टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
20 लाख रुपयांची तरतूद
विद्यापीठाचे कुलगुरू विविध कार्यक्रमांतून 482 एकर परिसरात 5 लाख झाडे लावण्याचे आवाहन करत असतात. या आवाहनाला जिल्हाभरातील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच या प्रकल्पासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकी विभागाच्या बजेटमधून 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
1 लाख 10 हजार झाडे लावली
विद्यापीठाने 1 लाख 10 हजार झाडे लावली. विविध प्रकारच्या प्रजातींचा समावेश आहे. फळझाडांमध्ये आंबा, पेरू, जांभूळ, चिकू, अंजीर, मोसंबी, संत्रा, काजू, फणस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, स्वीट मोहगुणी, बांबू, वड, पिंपळ, साग, रुद्राक्ष अशा अनेक जंगली झाडांचीही लागवड केली आहे.