सोलापूर

Solapur University: विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारक उभारणीचे काम रेंगाळले

स्मारक समिती सदस्याने कुलगुरूंच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर भंडारा उधळला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत स्मारक समितीचे सदस्य शरणू हांडे यांनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार यांच्या उपस्थितीतच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांच्या अंगावर भंडारा उधळला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

कुलगुरू प्रकाश महानवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता विद्यापीठात स्मारक समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू असतानाच स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून वातावरण तापले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शासनाने निधी मंजूर करूनही स्मारकाचे काम प्रलंबित आहे. प्रत्येक बैठकीत काम १० दिवसांत होईल, एका महिन्यात करू, अशी केवळ पोकळ आश्वासने व कारणे अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याचा आरोप हांडे यांनी केला आहे.

बैठक सुरू असतानाच शरणू हांडे यांनी पीडब्ल्यूडीचे अधिकारी, शाखा अभियंता आणि कंत्राटदार यांच्या अंगावर थेट भंडारा उधळला. सर्वजण भंडारा उधळत असताना शांत बसून होते. कुलगुरू डॉ. महानवर यांच्यावर मात्र भंडारा उधळला गेला नाही. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाने या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना सुबुद्धी व आशीर्वाद द्यावा, म्हणूनच मी हा भंडारा उधळल्याची प्रतिक्रिया शरणू हांडे यांनी दिली. थेट कुलगुरू महानवार यांच्या समोर घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, स्मारकाच्या संथ कामाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

यासदंर्भात विद्यापीठाचे प्रो. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT