सोलापूर : उजनी धरणाचे पाणी अखेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील धुबधुबी प्रकल्पात पोहोचले आहे. रविवारी सायंकाळी कणबस येथील मुख्य पुलावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जवळपास 25 वर्षांपूर्वी 400 हेक्टर जमिनीवर साकारलेला शिरवळ धुबधुबी प्रकल्प पावसाच्या पाण्यावर केवळ चार-पाच वेळाच भरला होता. परिसरातील पाच-सहा गावांचा पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबून असल्याने त्याचे महत्त्व अनमोल आहे.
गेल्यावर्षी पाणी सोडण्यासाठी शिरवळ येथे पंचक्रोशीतील नागरिकांनी उपोषण केले होते, ज्याची दखल घेत आमदार देशमुख यांनी दहा दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी काही प्रमाणात पाणी आले, परंतु तलाव केवळ 20-25 टक्केच भरला होता. यावर्षी मात्र, आमदार देशमुख यांनी जून महिन्यापासूनच तलाव पूर्ण भरण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रथम रामपूर व हणमगाव तलाव भरले. हणमगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेच पाणी शिरवळ तलावात पोहोचले. याप्रसंगी अभियंता प्रल्हाद कांबळे, कणबसचे सरपंच गंगाधर दुलंगे, इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, शिरवळचे उपसरपंच बसवराज पाटील यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.