कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील प्रसिद्ध उजनी येथील पद्मावती देवीच्या मंदिरातून सुमारे 6 लाख 45 हजार 250 रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत पद्मावती देवीचे मंदिराचे पुजारी महादेव शिवराम गाडगे (वय 53) यांनी फिर्याद दिली.24 जानेवारी रोजी सकाळी नागनाथ सुभाष भरडे यांनी पुजारी गाडगे यांना फोन करून मंदिर उघडे दिसत असल्याचे सांगितले. मंदिराचा सागवानी लाकडी दरवाजाच्या कडी कोंयडा तुटलेल्या अवस्थेत होता. मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाणे येथे फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मंदिरातून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीचा प्रकार झाल्याचे दिसून आले.
देवीच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ, गंठण, नथ असे एकूण चार तोळे एक ग्रॅम दागिने. एकूण रक्कम अंदाजे 3 लाख 69 हजार रुपये आहे. पद्मावती देवीचे चांदीचा टोप अर्धा किलो, दुसरा टोप 700 ग्रॅम, दीड किलो 20 ग्रॅम वजनाचे एकूण चार पादुका जोड , चांदीचे दोनशे ग्रॅमचे लिंग, चांदीचा घोडा , अर्धा किलोचेे चांदीचे ताट असे एकूण तीन किलो 260 ग्रॅमचे चांदीचे दागिने. ज्याची एकूण 2 लाख 76 हजार 250 रुपये. सोने व चांदी मिळून सहा लाख 45 हजार 250 रुपयांचे दागिने हे अज्ञात चोरट्याने पळवले आहेत. मंदिरास पोलिस उपाधीक्षक अंजना व्ही. एस. कृष्णा, पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी भेट दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक सारिका गोकुळ या करत आहेत.