सोलापूर : पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उजनी धरण परिसरातील २८२ कोटी ७५ लाख रुपयांचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
आराखड्यास यापूर्वीच राज्याच्या शिखर समितीने मान्यता दिली. परंतू पर्यटन विकासकामे कोण करणार, यावरुन प्रकल्प प्रलंबित राहिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन, पर्यटन विकास महामंडळ यांची जबाबदारी निश्चित करुन कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. उजनी धरण हे अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे. उजनीत पर्यटन विकासाला खूप मोठा वाव आहे.
पर्यटन सुरु झाल्यास उजनी धरण परिसरातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. परंतू उजनी ही जलसंपदा विभागाच्या आखत्यारित असल्याने तो प्रकल्प आम्ही राबवू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिखर समितीची मान्यता मिळूनही मागील दोन वर्षांपासून कामे सुरु होऊ शकली नाही. बोटींगसाठी निविदा प्रक्रीया राबवूनही तो पुन्हा प्रलंबित राहिला आहे. दरम्यान आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे जलपर्यटनाचा विषय पुढे सरकणार आहे.